पुणे - आईच्या भेटीचे ही राजकारण मोदी साहेब करतात, आम्ही ही वेळ असेल तसे आईला जाऊन भेटतो. मात्र, मोदी जे करतात तसे काही करत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत इंदापूर तालुक्यातील सणसर इथे अजित पवार बोलत होते.
सध्या महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवार कुटूंबीय आणि शरद पवार यांच्यावर सातत्याने टिका करताना दिसत आहेत. त्यामुळे अजित पवार ही ठिकठिकाणच्या प्रचार सभांमध्ये पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची संधी सोडत नाही. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मोदींची आई भेट आणि त्याची प्रसिद्धी यावर निशाणा साधत चांगलाच समाचार घेतला.
आता मी सभा झाल्यावर आईला जाताजाता काटेवाडीत भेटणार विचारपुस करणार आणि पुढे निघुन जाणार, पण माझ्या जागी जर दुसरी व्यक्ती असती तर काय केले असते. पहिल्यांदा चॅनेलवाले बोलविले असते. मग दोन खुर्च्या घराबाहेर ठेवल्या असत्या. एकावर स्वत: बसले असते आणि दुसऱ्यावर आईला बसवले असते. तिच्याकडून गोंजारून घेतले असते आणि त्याचे फोटो काढून लगेच सोशल मीडियाला टाकले असते, अशी टीका करत चार भिंतींच्या आत भेटा आईचे पाय धरा आईच्या जवळ जावा, आईच्या कुशीत झोपा, पण ही नौटंकी कशाला? असा टोला अजित पवारांनी लगावताच सभेत एकच हशा पिकला.