पुणे Ajit Pawar Ram Mandir Invitation : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या सर्वांनाच लागली आहे. त्यातच हा सोहळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. येत्या 17 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसंच 22 जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक राजकीय नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात येतंय. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रणासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, मला अद्याप राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण आलेलं नाही. निमंत्रण आलं तर जायचं की नाही याचा विचार करेन. आज सकाळी मी देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात केलीय. मी तर सर्वधर्मसमभाव मानणारा आहे.
भिडे आणि फुले वाड्याची केली पाहणी : आज (23 डिसेंबर) पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिडे वाडा आणि फुले वाड्याची पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ते म्हणाले की, "लवकरच इथं जागतिक दर्जाचं स्मारक तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक कुटुंबांना शिफ्ट करण्यात येणार आहे. यापूर्वी देखील काही कुटुंबांना येथून शिफ्ट करण्यात आलं होतं. आता काही घरं राहिलीत. पण इथं मालक वेगळे आणि भाडेकरू वेगळे आहेत. त्यामुळं आता आम्हाला मालकाला देखील खुश करावं लागणार आहे, तसंच भाडेकरूंनादेखील पर्याय द्यावे लागणार आहेत."
तज्ज्ञांची मतं घेऊन शाळा बांधण्यात येणार : पुढं ते म्हणाले की, "भिडे वाड्याची जागा कमी आहे. चौदा मजले वर जावं लागेल पण ते योग्य नाही. तिकडे सगळ्या सुविधा देता आल्या पाहिजेत. भिडे वाड्यात पार्किंग प्रॉब्लेम असून तो सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे." तसंच सावित्रीबाई फुले यांच्या नावानं शाळा सुरू करताना तज्ज्ञांची मतं घेऊन शाळा बांधण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा -