पुणे : मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने निषेध आंदोलन केले आहे. मनोहर भिडे यांनी अगोदर महात्मा गांधी आणि त्यानंतर महात्मा फुले यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याने, राज्यभरात भिडे यांच्या विरोधात आंदोलन केली जात आहेत. परंतु सरकारकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे मनोहर भिडेंना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने आज आंदोलन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून टिका : संभाजी भिडे हिंदुत्ववादी असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई होत नाही, अशी राजकीय टीका होत होती. परंतु आता अजित पवारसुद्धा त्यांच्यासोबत युतीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मनोहर भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भिडे हे मनोरुग्ण असल्याची टीकासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.
कारवाई करण्याची लेखी मागणी : महात्मा गांधीजींचा हा देश असून, मनोहर भिडे हे संभाजी कधी झाले हे आधी सांगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सातत्याने महापुरुषांचा अपमान करणाऱ्या विकृत माणसाला अटक करून त्याच्यावर कारवाई करा. आम्ही सत्तेत जरी असलो तरी आमची सरकारकडे ही मागणी आहे. उद्या अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळेस अजित पवारांनासुद्धा भिडे यांच्यावर कारवाई करण्याची लेखी मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया, शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली आहे.
मनोहर भिडे यांचा जाहीर निषेध : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रूपाली पाटील ठोंबरे आदिने या आंदोलनात सहभाग घेतला होता. या आंदोलनात कार्यकर्ते महिला, युवक कार्यकर्त्याने मनोहर भिडे यांचा जाहीर निषेध करून जोरदार घोषणा दिल्या आहेत.
हेही वाचा -