पुणे : शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अदानी समुहाला पाठिंबा दिला आहे. यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. याप्रकरणी बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शरद पवारांच्या विधानाला पाठिंबा दिला आहे. पुण्यात आज श्रमिक पत्रकार भवन येथे ज्येष्ठ पत्रकार श्याम दौडकर यांनी लिहिलेल्या धडपड या पुस्तकाचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
'राजकारणात शिक्षणाचा मुद्दा गौण आहे' : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, ही व्यक्ती देशाचा पंतप्रधान म्हणून 9 वर्ष काम करत आहे. त्यांच्या नावावर 2014 साली या देशात बहुमताने सरकार आलं आहे. त्यांच्याच नावावर वेगवेगळ्या राज्यात सरकार येते. त्यामुळे आता 9 वर्षांनी असले मुद्दे काढून काहीही फायदा नाही. राजकारणात शिक्षणाचा मुद्दा गौण समजला जातो. राजकारणात केवळ वयाची अट आहे. तसेच हे माझं वैयक्तिक मत असल्याचही अजित पवार म्हणाले आहेत.
'मी नॉटरिचेबल नाही' : काल अजित पवार नॉटरिचेबल आहेत अशा बातम्या आल्या होत्या. यावर बोलताना ते म्हणाले की, तुम्ही मला नॉटरिचेबल म्हणू नका. काल मला पित्ताचा त्रास झाला म्हणून मी माझा कालचा दौरा रद्द केला होता. मला झालेला त्रास मी कोणालाही सांगितल नाही. मी घरी जाऊन आराम केला. मी काल माझ्या डॉक्टरांशी बोलत होतो. म्हणून मी कोणालाही न सांगता निघून गेलो, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदेना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. यावर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, जे गेले त्यांना मनापासून शुभेच्छा. ज्यांना जिथे जायची इच्छा असते त्यांनी देवदर्शनाला जावं. यामध्ये काहीच वाईट नाही. फक्त त्याचा बाऊ करु नये. मंत्री तिकडे जात असताना ज्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे त्यांनी राज्यात बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या असे प्रश्न आहेत याचे भान ठेवावे. तसेच माझ्यावर जे भाजपच्या जवळच असल्याचे आरोप केले जातात ते धादांत खोटे आहेत. मी याला फार महत्व देत नाही, असे देखील पवार यावेळी म्हणाले.