पुणे - महानगरपालिकेत शुक्रवारी आयोजित भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला होता. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला एकत्र येणार असल्याने कार्यक्रमाची जोरदार चर्चा होती. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महापालिकेच्या या कार्यक्रमाला भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आले. तर अजित पवार पालकमंत्री असल्याने त्यांच्या हस्ते उदघाटन ठेवण्यात आले.
हे दोन्ही नेते पुण्यात दुसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर आले असल्याने या कार्यक्रमाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. दरम्यान, हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या सभागृहाबाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येत गटा-गटाने जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. भाजपचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फडणवीस यांच्या तसेच खासदार गिरीश बापट यांच्या जयजयकाराच्या घोषणा करत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने घोषणा देण्यात आल्या. एकंदरीतच काही काळ ही घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले.