पुणे - मागील पंधरा दिवसांपूर्वी काढणीला आलेला बटाटा परतीच्या पावसाने चिखलात सडला आहे. सतत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे लागवड केलेला कांदाही वाहून गेला. त्यामुळे शेतकरी हतबल होऊन आता जगायच तरी कसं, असा प्रश्न विचारत आहे.
चांगले उत्पादन मिळाले, तर बाजारभाव नसतो. यंदा बाजारभाव चांगला होता, तर पावसाने शेतीचा चिखल झाला; आणि कांदा-बटाट्याचे पीक शेतातच सडले. परतीच्या मान्सूनमुळे यंदा अतिवृष्टी झाली. कांद्याच्या शेतांना तलावाचे स्वरुप आले. त्यामुळे पहिलंच कंबरडं मोडलेलं असताना पुन्हा पाऊसाने सारं काही वाहून गेल्याने शेतकरी हतबल झालाय.
कांद्याचे बियाणे 2500 ते 4000 रुपये प्रतिकिलो प्रमाणे खरेदी करून रोपं टाकली होती. मागील महिन्यात झालेल्या पावसाने कांद्याची रोपं पाण्याखाली जाऊन खराब झाली. त्यामुळे पुन्हा नव्याने रोपं टाकून लागवड करण्यात आली. मात्र आता परतीच्या पावसाने पुन्हा शेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी बराखीत पाणी शिरल्याने कांदा सडला आहे.