पुणे - सध्या मावळातील राजकारण दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. भाजपचे बंडखोर रवींद्र भेगडे यांनी विधासभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टाई करावी लागली. कोणतेही आश्वासन किंवा जबाबदारी मिळावी म्हणून उमेदवारी अर्ज भरला नव्हता, असे रवींद्र भेगडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवर निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, मुंबईला जावे लागले अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - पुण्यात चंद्रकांत पाटलांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज
मावळमधील राजकीय उलथापालथ सुरूच आहे. भाजपकडून इच्छुक बंडखोर उमेदवार रवींद्र भेगडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत रवींद्र भेगडे यांची मनधरणी करण्यात आल्यानंतर त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षासाठी जे करावं लागेले ते करेन, अशी भावना रवींद्र भेगडे यांनी व्यक्त केली आहे. तर राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे म्हणाले की, रवींद्र भेगडे हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते आहेत. त्यामुळे पक्षाचा विजय निश्चित आहे. भविष्यात पक्षश्रेष्ठी रवींद्र भेगडे यांचा विचार नक्की करेल असेही ते म्हणाले.
हेही वाचा - बारामतीतून एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास