पुणे : डॉ. अनिल रामोड यांना आज न्यायालयात हजर केल्यावर झालेल्या सुनावणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल जेव्हा सीबीआय कडून डॉ. अनिल रामोड यांच्या कार्यालयात रेड टाकण्यात आली तेव्हा त्यांच्या कार्यालयातून तीन आयफोन मोबाईल सापडले आहे. यात 2 जुने आणि एक नवीन आयफोन होता. काल केलेल्या तपासात एकूण 6 कोटी 64 लाख जप्त केले आहे. अधिक तपास तसेच डॉ. अनिल रामोड यांची 'व्हाइस टेस्ट' करायची आहे, असे यावेळी सीबीआय अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.
फ्लॅटवर छापेमारी: डॉ. रामोड यांनी आठ लाख रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार एक महिन्यांपूर्वी सीबीआयकडे आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर काल दुपारच्या सुमारास रामोड यांच्या कार्यालयातच सीबीआयने सापळा रचला होता. त्यानंतर आठ लाख रुपयांची तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रामोड यांना रंगेहात पकडण्यात आले. रामोड यांच्या औंध बाणेर परिसरातील फ्लॅटवर देखील सीबीआयने छापेमारी केली आणि तब्बल या छाप्यात 6 कोटी 64 लाख रुपये जप्त केले आहे.
खासगी निवासस्थानीही छापा: या कारवाईनंतर दुपारी 'सीबीआय'ने रामोड यांचे महसूल विभागातील कार्यालय तसेच सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील 'ऋतुपर्ण' सोसायटी या खासगी निवासस्थानीही छापा टाकला आहे. रामोड हे मूळचे नांदेडचे असून मागील 2 वर्षांपासून ते पुण्यात अतिरिक्त विभागीय आयुक्त आहेत. पुण्यासारख्या शहरात एवढी मोठा कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच एवढे मोठे अधिकारी थेट लाच घेताना अटक होत असल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. केंद्रीय एजन्सीने त्याच्या मालमत्तेवर छापे टाकताना 6 कोटी रुपयांची रोकडही जप्त केली, असे सीबीआयने म्हटले आहे. आरोपी अनिल गणपत रामोड हा NHAI कायद्यांतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी (NHAI) पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी 'लवाद' देखील आहे.