पुणे - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळातर्फे 2015 साली मानाचा मुजरा हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमातील वाढीव 10 लाख 78 हजार रुपये पंधरा दिवसात भरण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिला आहे. धर्मदाय आयुक्तांच्या या आदेशावर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळाने नाराजी व्यक्त करत धर्मदाय आयुक्तांच्या या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केले आहे.
मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालक मंडळाच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, अलका कुबल, प्रिया बेर्डे, मिलिंद अष्टेकर व इतर माजी संचालक उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.
आम्ही कार्यक्रमात खर्च केला आह, पैसे भरणार नाही
2010 ते 2015 या कालावधीत मानाचा मुजरा हा कार्यक्रम झाला होता. यामध्ये सुरुवातीला घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आता वाढीव खर्च झाल्याचे सांगत आमच्याविरोधात राजकारण करण्यात येत आहे. मानाचा मुजरा या कार्यक्रमात हा जो वाढीव खर्च झाला आहे. तो महामंडळाच्या सभासदांवरच झाला आहे. हॉटेल, राहण्याची व्यवस्था, कलाकारांना ये-जासाठी वाहन व्यवस्था अशा स्वरूपातच हा खर्च झाला आहे. आम्ही कोणीही आमच्यावर वयक्तिक खर्च केलेला नाही. महामंडळाच्या पैशांवर करणार नाही. आम्ही कलाकार आहोत म्हणून आम्हाला माहीत आहे, की एखादी संस्था कशा पद्धतीने चालवली जाते म्हणून धर्मदाय आयुक्तांनी जो आदेश दिला आहे. त्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. आम्ही खर्च केलाच नाही तर आम्ही ते पैसे भरणार नाही, असे ही यावेळी विजय पाटकर म्हणाले.
विद्यमान अध्यक्षांनी मराठी चित्रपट सृष्टीसाठी काय केले
2015 पासून आमच्यावर सुरुवातीला जे आरोप करण्यात येत होते. आत्ताही जे राजकारण करण्यात येत आहे. ते महामंडळाच्या विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्याकडून करण्यात येत आहे. राजकारण आणि धमक्यांशिवाय त्यांनी काहीच केले नाही, असा आरोपही यावेळी विजय पाटकर यांनी केला.
महामंडळाची निवडणूक लढवणार
मी अजूनही या क्षेत्रात असून मी आजही सामाजिक काम करत आहे. येणारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक मी लढवणार असल्याचेही पाटकर यांनी यावेळी जाहीर केले.