पुणे - पुण्यातील कात्रज येथील डोंगरावर लागलेली आग विझविण्यासाठी सिनेअभिनेते सयाजी शिंदे सरसावले आहेत. आज दुपारच्या सुमारास या परिसरात आग लागली होती.
हेही वाचा - 'पॉईंट्समन' नव्हे तर 'पॉईंट्सवूमन'; 'त्या' तिघी करतात रोज रेल्वेच्या शँटिंग
शिंदे आणि त्यांचे काही सहकारी आज दुपारी या मार्गाने जात असताना त्यांना डोंगरावर वणवा लागल्याचे पहायला मिळाले. आगीचे स्वरूप जास्त वाढून इतर झाडांचे नुकसान होऊ नये म्हणून शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी आग विझवली.
सयाजी शिंदे हे पुणे महापालिकेतील नगरसेवक राजा बराटे यांच्यासह एका कार्यक्रमासाठी साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. त्यांची गाडी कात्रज येथील नवीन बोगद्याजवळून जात असताना त्यांना धुराचे लोट दिसले. त्यांनी गाडी थांबवून पाहिले असता त्यांना डोंगरावर आग लागलेली दिसली. त्यानंतर गाडीतील इतर सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी आगीच्या दिशेने धाव घेतली आणि झाडाच्या फांद्या आणि मातीच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. दरम्यान डोंगरावर वारा सुटला असल्यामुळे आणि गवत वाळले असल्यामुळे आग आणखीनच पसरत होती. तर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आग विझविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. त्यानंतर तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. संपूर्ण आग विझल्याची खात्री झाल्यानंतरच शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह तिथून निघून गेले.