बारामती - शहरातील व्यापारी प्रितम शहा यांच्या आत्महत्येच्या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आहे. त्यानंतर त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली
सावकारी जाचातून शाह यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १८ नोव्हेबरला ९ जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी बारामती शहरातील अपक्ष विद्यमान नगरसेवक जयसिंग देशमुख, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे, जयेश काळे, हनुमंत गवळी, प्रवीण गालिंदे, सुनील आवाळे, विकास धनके यांना अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना आज न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
असे आहे प्रकरण....
या घटनेची हकीकत अशी की, मृत प्रितम शशिकांत शहा यांना वरील आरोपींनी व्याजाने पैसे दिले होते. दिलेल्या पैशाच्या व्याज वसुलीसाठी तसेच बारामती शहरातील सह्योग सोसायटी येथील बंगला नावावर करून घेऊन प्रितम शहा यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशी आत्महत्येपूर्वी शहा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये आरोपींच्या नावाचा उल्लेख केलेला होता. त्यानुसार प्रितम शशिकांत शहा यांचा मुलगा प्रतिक शहा यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर केले होते.