पुणे - रावेत पोलिसांनी स्केच आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका टोळक्याला अटक केली आहे. जेवणाचे बील मागितल्यावरून हॉटेलमधील वेटर आणि मालकाला तसेच सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करणारी ही टोळी जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. नऊ महिन्यानंतर त्यांना अटक झाली आहे.
युवराज नवनाथ कुदळे (वय - 19), ओंकार पोपट साठे (वय - 22), चेतन उर्फ सागर रतन येवले (वय - 20), अफजल मेहबूब शेख (वय - 21), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हॉटेल मालकासह इतरांना बेदम मारहाण
रावेत येथील हॉटेल गोकुलमध्ये नऊ महिन्यांपूर्वी म्हणजेच 6 डिसेंबर 2019 रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास आरोपींनी एका हॉटलेमध्ये जेवण केले होते. त्याचे बिल वेटर पाटील यांनी मागितले. त्यावरून चिडून आरोपींनी पाटील तसेच हॉटेलचे मालक कुणाल भेगडे यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या सुरक्षारक्षक मनोजकुमार यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर आरोपी झाले होते फरार
यामध्ये एकाचा स्मृतिभ्रंश झाला होता. या घटनेनंतर आरोपी पसार झाले. तक्रारदारांनी वर्णन केलेली होंडा सिटी कार वापरणाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र, आरोपींचा शोध लागू शकला नाही.
स्केच वरून आरोपींचा लागला शोध
अखेर पोलिसांनी तक्रारदाराना केलेल्या वर्णनावरून आरोपींचे स्केच तयार केले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तब्बल नऊ महिन्यांनंतर आरोपींची नावे स्पष्ट झाली. त्याआधारे या सर्व आरोपींना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.