दौंड(पुणे) - दौंड तालुक्यातील सोलापूर महामार्गावर असलेल्या वाकडा पूल येथे २०१८ मध्ये एका ट्रकला अडवून चालकाला लुटल्याची घटना घडली होती. या दरोड्यातील फरार आरोपींना अटक करण्यास यवत पोलिसांना यश आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप येथून त्याला अटक केली आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी अभिजीत शिवाजी दांडेकर असे आरोपीचे नाव आहे. तर परशुराम चंद्रशेखर मदने असे लूट झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
२०१८मध्ये घडली लुटीची घटना-
यवत पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी ट्रक चालक परशुराम चंद्रशेखर मदने यांनी तक्रार दिली होती. 26/08/2018 या दिवशी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील वाखारी गावाजवळच्या वाकडा पुल येथील हायवेवर मदने यांच्या ट्रकला एका चार चाकी टेम्पोने ओव्हरटेक केले. त्यानंतर ट्रकच्या पुढे टेम्पो उभा करून चालक मदने यांना मारहाण केली. त्यांच्या जवळील रोख रक्कम ,मोबाईल फोन ,ट्रक मधील साऊंड, ड्रायव्हिंग लायसन असा एकूण १९,९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल माल चोरून नेला होता.
यवत पोलिसांनी शिताफीने आरोपीस केले अटक -
हा गुन्ह्यातील आरोपी अभिजीत शिवाजी दांडेकर हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता. तो मंद्रूप येथे वास्तव्यास असल्याबाबतची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. त्यांनी मंद्रूप येथे जाऊन मंद्रूप पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या गावी जाऊन आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. या आरोपीला दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे .