पुणे - संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे अनेक क्षेत्रात गोंधळाचे वातावरण आहे. शिक्षण क्षेत्र देखील याला अपवाद नाही. परीक्षा न झाल्याने अनेक विद्यापीठांनी सरासरी पद्धतीने निकाल लावले आहेत. या निकालांमुळेही विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत अनेक महाविद्यालयात पुढील सत्राची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ही नोंदणी करत असताना विद्यार्थ्यांच्या शुल्कात 30 टक्के कपात करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने(अभाविप) केली आहे.
कोविड-19 च्या काळात पालकांच्या आर्थिक स्थितीचा विचार करता, त्यांना पूर्ण शुल्क भरणे शक्य नाही. या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये राज्यशासन व विद्यापीठ प्रशासनाविरोधात प्रचंड रोष वाढत आहे. विद्यार्थी त्यांच्या मागण्या घेऊन सतत शिक्षणमंत्री, शुल्क नियंत्रण समिती, विद्यापीठ प्रशासन यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. मात्र, शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आंधळे आणि बहिरे आहे की काय? असा सवाल अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी उपस्थित केला.
27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत अभाविप संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जनजागृती करणार आहे. यासाठी राज्यातील सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना विविध मागण्यांचे पत्र देऊन याविषयी त्यांच्याकडून समर्थन पत्र घेणार असल्याचेही स्वप्नील बेगडे यांनी सांगितले.