पुणे - जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत आलेल्या तीन दरोडेखोरांना आळेफाटा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मात्र, या कारवाई दरम्यान याच टोळीसोबत असणारे आणखी दोन आरोपी फरार झाले. या दोन आरोपींचा आळेफाटा पोलीस शोध घेत आहेत. आळेफाटा पोलिसाच्या सतर्कतेमुळे या दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. शंकर जाधव, गजानन नरवडे, ज्ञानेश्वर चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पाच दरोडेखोर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नाने त्यांच्याकडील हुंडाई (क्र.एमएच 02 एम 4319) या वाहनाने आळेफाटा येथे आले होते. याची खबर आळेफाटा पोलिसांना खब-यामार्फत मिळताच आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी तात्काळ कारवाई केली.
या कारवाईदरम्यान आळेफाटा पोलिसांनी. शंकर जाधव, गजानन नरवडे, ज्ञानेश्वर चौधरी (तिघे रा.गंगापुर, नाशिक) यांना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 4 लाख रूपये किमंतीची हुडांई असेट गाडी, 1 कटावणी, 1 चाकू, दोरी, मिरचीपुडी, कोयता आदी साहित्य जप्त केले.