पुणे - मला दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, सुजलाम-सुफलाम महाराष्ट्र बनवायचा असून मी या यात्रेत मत मागायला आलो नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला ३ टक्के मतदानात वाढ झाल्याने विधानसभेतसुद्धा घवघवीत यश मिळेल, असा आशावाद युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आळेफाटा येते व्यक्त केला आहे.
रविवारी सायंकाळी 'जन आशीर्वाद' यात्रा पुणे जिल्ह्यात पोहोचली. यावेळी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जनतेचा कौल घेण्यासाठी निघालेली ही यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे. जनतेच्या मनातील नवमहाराष्ट्र मला घडवायचा आहे. तो विचार जनतेच्या मनातून जाणून घेऊन, तसा महाराष्ट्र मला घडवायचा असल्याचे मत, आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे.
त्याचबरोबर, महाराष्ट्रावर उद्याची भगवी सत्ता ही जनतेच्या न्याय हक्काची सत्ता असून मला जनतेची स्वप्ने महाराष्ट्राच्या विधानसभेत स्थापन करायची आहे. यासाठीच शिवसेनेतर्फे यात्रा निघाली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजयबापू शिवतारे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आमदार शरद सोनवणे, अक्षय आढळराव पाटील, पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण आदी उपस्थित होते.