पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी भागात एका महिलेचा घरात घुसून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. छाया पांडुरंग गुंजाळ (वय - 52) राहणार तुळजाभवानी नगर काळेवाडी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. जेव्हा, महिलेवर हल्ला करण्यात आला त्यावेळी अज्ञात व्यक्तीने लाईट बंद केली होती. त्यामुळे हल्लेखोर किती आणि कोण होते हे समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी परिसरातील तुळजाभवानी नगर येथे गुंजाळ कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून मृत छाया यांच्या सासू नेहमीप्रमाणे आजदेखील पहाटेच्या सुमारास भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांच्याकडून घराचा दरवाजा उघडा राहिला. याचाच फायदा घेत अज्ञात व्यक्तीने घरातील बाहेरून आणि आतून लाईट बंद करून घरात गाढ झोपेत असलेल्या छाया गुंजाळ यांच्यावर टणक वस्तूने प्रहार केला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला आहे असे पोलिसांनी सांगितले. या घटनेत घरातील आणखी एक महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अंधार असल्याने हल्लेखोर व्यक्ती कोण हे समजू शकले नाही. मात्र, घरात मृत छाया यांच्यासह सून, मुलगा, पती आणि सुनेची आई हे सर्व होते. त्यामुळे खून झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असून नेमका खून केला कोणी हे शोधण्याचे आव्हान वाकड पोलिसांसमोर आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - थोडाश्या पावसानेही घरात शिरते पाणी; दत्तवाडीतील गायकवाड कुटुंबाची 3 वर्षांपासून वाताहात