पुणे - कोरोना संकट असल्याने सध्या शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. ऑनलाइनच्या नावाखाली मुलांच्या शिक्षणाची लाईनच बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. शाळा बंद, त्यामुळे जो काही अभ्यास आहे तो मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. त्यात मुलांना नक्की किती शिकायला मिळते, हा संशोधनाचाच विषय असताना पुणे जिल्ह्यातील एका गावाने मात्र अनोखी शक्कल लढवत संपूर्ण गावच शाळा बनवली आहे. या अनोख्या गावात सगळेच चालता बोलता अभ्यास करतात.
हेही वाचा - बारामती पोलिसांनी चित्त थरारक पाठलाग करून चोरट्याला पकडले, पहा व्हिडिओ..
कोरोना काळात एक सकारात्मक उपक्रम
कोरोनामुळे शाळा बंद झाल्या, मात्र विद्यार्थ्यांचा अभ्यास बंद होऊ नये म्हणून अख्ख गावच शाळा झाली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेले म्हाळवडी गावात इंटरनेट सेवा नीट नसल्याने ऑनलाइन शिक्षण किंवा अभ्यास क्रम पूर्ण करता येत नव्हता. त्यात शाळा बंद असल्याने मुले अभ्यासही करत नव्हती यावर उपाय म्हणून ग्रामस्थ, शिक्षक आणि गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावातील घरांवर अभ्यासक्रम लिहिण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
घरांच्या भिंतींवर आभ्यासक्रम
मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित आशा सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम घरांच्या भिंतीवर उतरवला जात आहे. गावातील तरुणच हे काम करीत आहेत. गावभर अभ्यास असल्याने मुले देखील मजेत या नव्या शिक्षण पद्धतीचा आनंद घेत आहेत.
मुलांबरोबर मोठ्यांचीही उजळणी
आभ्यासाच्या बोलक्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांबरोबर गावकऱ्यांचीही उजळणी होत आहे. ग्रामस्थही जाता येता आवडीने भिंतींवरील माहितीवर नजर टाकतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा - पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही लसीकरण बंद; नागरिक हवालदिल