पुणे (पिंपरी-चिंचवड) - जिल्ह्यातून तडीपार केलेला सराईत गुन्हेगार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आढळल्याने त्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. साहिल रामदास कुंभार (वय 22, वर्षे रा. चिंचवड), असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
साहिलवर चिंचवड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र तो तडीपारीचे नियम मोडून फिरत होता. या प्रकरणी पोलीस कर्मचारी के. एम. पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल कुंभार हा चिंचवड पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला 5 फेब्रुवारी, 2020 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो पिंपरी-चिंचवडमध्ये आला होता. वाकड पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला पुनावळे येथील मंगलधारा सोसायटीच्या समोरील रस्त्यावरून जात असताना सापळा लावून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले असून त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'अजून किती महिलांवर अत्याचार झाल्यानंतर सरकारला जाग येणार?'