पुणे : पुणे तिथं काय उणे अस नेहेमी म्हटले जाते. याची प्रचिती ही नेहेमी विविध माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला पुण्यातील रिक्षा सजवलेल्या, त्यावर विविध आकर्षक अशी सजावट केलेली अनेक रिक्षा आपण पुण्यातील रस्त्यावर धावताना पाहतो. यात काहींनी तर रिक्षात एसी बसवली तर, काहींनी तर थेट 11 लाख रुपये खर्च करून रिक्षामध्ये फ्रिज, टिव्ही बसवलेले आपण पाहिले आहे. अशातच पुण्यातील एका रिक्षाचालकाने चक्क गेल्या 3 वर्षापासून रिक्षामध्येच कुसुमाग्रज फिरते वाचनालय सुरू केले आहे. याला प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे.
मराठी टिकवण्याासाठी वाचनालय : मराठी वाचनालय टिकावी, ती पुढे जावी यासाठी विदर्भातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या प्रियांका चौधरी या मुलीने गेल्या काही वर्षापासून एक मुक्त वाचनालय सुरू केले आहे. जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये 72 मुक्त वाचनालय या युवतीने सुरू केले आहे. मात्र, ती पुण्यात राहत असताना शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षाचा व्यावसाय चालते असे तीच्या लक्षात आले. त्यावेळी तीच्या डोक्यात रिक्षात वाचनालय सुरू करण्याची संकल्पना आली. तेव्हा कोथरूडात असलेल्या मुक्त वाचनालयात पुस्तकांची आवड असलेले रिक्षाचालक पंकज कांबळे येत होते. तेव्हा प्रियांकाने पंकज कांबळे यांना फिरते वाचनालयसाठी सरू करण्यासाठी त्यांना विनंती केली. त्यांनीही प्रियंकाच्या विनंतीला मान देऊन 2018 साली मराठी भाषा दिनाच्या दिवशी कुसुमाग्रज फिरते वाचनालय सुरू केले.
सर्व पुस्तके दान : याबाबत प्रियंका चौधरी म्हणाल्या की, आज आपण पाहतोय की मराठी साहित्य टिकत नाही, अशी चर्चा सर्वत्र सध्या सुरू आहे. आपण आपली मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण काय करतो? तर कुठल्याही भाषेमधील साहित्य टिकवायचे असेल तर, ती भाषा टिकते. म्हणूनच गेल्या 3 वर्षापासून कुसुमाग्रज यांच्या नावाने हे फिरते वाचनालय सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मराठी भाषेचीच फक्त पुस्तके असून सर्व मराठी लेखकांची यात पुस्तके आहे. कारण जास्तीत जास्त मराठी भाषा लोकांपर्यंत गेली पाहिजे. मराठी साहित्य टिकले पाहिजे या उद्देशाने हे फिरते वाचनालय सुरू केले असल्याचे यावेळी प्रियंका चौधरी यांनी सांगितले. या फिरत्या वाचनालयात असणारी सर्व पुस्तके दान आलेली असतात असे या वाचनालयाचे एक वैशिष्ट्य आहे. सुरवातीला जेव्हा हे फिरत वाचनालय सुरू करण्यात आले तेव्हा जवळपास 200 विविध लेखकांची पुस्तके हे लोक चळवळीतून वाचनालयाला दान केलेली होती. याच माध्यामातून पुढे वाचनालयात जवळपास दिड हजार पुस्तकांची देवाण घेवाण झाली.