पुणे - दौंड तालुक्यातील पाटस येथील कोविड सेंटरमधून ११ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह मुलीला घेऊन तिची आई पसार झाली होती. या आईसह तिच्या मुलीला व भावाला परत आणण्यात आरोग्य सेवकाला यश आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती न देता आईने तिच्या मुलीसह भावाबरोबर आपल्या घराची वाट धरली होती. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली होती.
दौंड तालुक्यातील चौफुला येथे राहाणारी अकरा वर्षाची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ती गेल्या दोन दिवसापासून पाटस येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज सकाळी तिची आई व मामा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना काहीही न सांगता तिला गुपचूप गाडीवर बसून घराच्या दिशेने पळ काढला. यावेळी कोविड सेंटरमधील आरोग्य सेविका उषा विठ्ठल मुरमुरे यांनी रुग्णांचा पाठलाग केला. परंतु, मुलीसह तिची आई आणि मामा दुचाकीवरून कोविड सेंटरमधून निघून गेले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य सेविका मुरमुरे यांनी आपले वरिष्ठ आरोग्य सेवक भीमराव बडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बडे यांनी स्थानिक बालगुडे यांच्या मदतीने दुचाकीवरून मुलीसह तिची आई व मामाचा पाठलाग केला व वरवंड गावच्या हद्दीत त्यांना गाठून परत कोरोना सेंटरमध्ये आणले.
मुलीची आई कोरोना पॉझिटिव्ह -
यानंतर पाटस येथील कोविड सेंटरमध्ये मुलीच्या मामाची आणि आईची कोविड तपासणी करण्यात आली. यावेळी मुलीचा मामा निगेटिव्ह आढळला, तर मुलीची आई पॉझिटिव्ह आढळली आहे. मुलीसोबत तिच्या आईवर कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिली. कोणी रुग्ण पळून गेले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिला आहे.
हेही वाचा - 'मराठा आरक्षणाचे मातेरे तर शिक्षण क्षेत्राचा बट्याबोळ'; चंद्रकांत पाटील यांची टीका