पुणे - डिंभे बोगद्याच्या कामासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार तातडीने या कामाचा प्रस्ताव करण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि विखे पाटील यांनी दिले. धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे म्हणून गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. नदीवरील तसेच कालव्यावरील अनियंत्रित व अनधिकृत पाणीउपशावर नियंत्रण आणावे. या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगाना पाणी दिले जाते. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे, सूचना यावेळी मंत्रीमहोदयांनी दिल्या. दरम्यान, डिंभे डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी बिगरसिंचनामधून ३० कोटी खर्चून काम करण्यात आले आहे. यावर्षी अजून ३० कोटी खर्च करण्याचे नियोजन असल्याचे मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांनी सांगितले.
दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित करण्यात आले - कुकडी डावा कालव्याचे सुरू असलेल्या रब्बी हंगामात एक आवर्तन आणि उन्हाळी एक आवर्तन देण्यात येणार असून पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उन्हाळी हंगामांच्या दुसऱ्या आवर्तनाबाबत बैठक घेण्याचेही यावेळी ठरले. माणिकडोह धरणातून येडगाव धरणासाठी कुकडी नदीद्वारे, पिंपळगाव जोगे डावा कालवा, डिंभे उजवा कालवा, डिंभे डावा कालवा, घोड शाखा कालवा, मीना शाखा कालवा, मीना पूरक कालवाद्वारे पाणी सोडण्याचे नियोजनही यावेळी निश्चित करण्यात आले. घोड डावा व उजव्या कालव्याची रब्बीची दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित करण्यात आले. रब्बी हंगामानंतर पाणीसाठा उन्हाळी आवर्तनाबाबत बैठक घेण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
यांची उपस्थिती - यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, आमदार सर्वश्री दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोषकुमार सांगळे आदी उपस्थित होते.
२०२३ पासून सोडणार - आजच उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सोडण्याचे बैठकीत ठरले आहे. बैठकीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार सुभाष देशमुख, संजय शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, माजी आमदार कल्याणराव काळे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.
माढा उपसा सिंचन योजना - प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांच्यावरील पाणी पट्टी वसुली तसेच त्याबाबतचे व्यवस्थापन करणे वाढत्या सिंचन क्षेत्रामुळे व मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे पाटबंधारे विभागाला कठीण जात आहे. त्यामुळे ते व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याचा पर्याय अवलंबवावा, असे निर्देश मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिले. त्यानुसार दहिगाव उपसा सिंचन योजना आणि सीना माढा उपसा सिंचन योजना या दोन योजना तसेच भीमा, सीना आणि माण नदीवरील ५० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे संपूर्ण व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यात येईल असे मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांनी सांगितले.
४ ऐवजी ५ आवर्तने द्यावीत - सोलापूर महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदीत पाणी सोडावे लागते. महापालिकेला थेट पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईनच्या कामास गती देण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले. ३० जून २०२३ पर्यंत ४ अवर्तने सोडण्याचे नियोजन केले असल्याचे यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर विभागाने योग्य नियोजन करून कालव्याची ४ ऐवजी ५ आवर्तने द्यावीत अशा सूचना पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या वेळी काही दिवसांसाठी नदीकाठच्या गावांचा कृषीपंपांचा वीजपुरवठा बंद करावा जेणेकरून अवैध पाणी उपसा बंद होऊन पाणी बचत होईल, असेही ते म्हणाले.
रब्बीचे पहिले आवर्तन १५ जानेवारीला - पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा तसेच सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलाशयातील बाष्पीभवन कमी करण्याच्यादृष्टीने शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या. उजनी (भीमा) प्रकल्प उजवा कालवा आणि डावा कालवा या दोन्ही कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सुरू करण्याचे बैठकीत ठरले. तसेच भीमा सीना जोड कालव्यातून २० डिसेंबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान पहिले आवर्तन सोडण्यात यावे, धरणातून भीमा नदीत १० जानेवारी २०२३ रोजी पाणी सोडण्यात यावे. हे पाणी सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला नगरपालिका व भीमा नदी तीरावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी हेळ्ळी बंधाऱ्यापर्यंत सोडण्यात यावे. सीना माढा उपसा सिंचन योजना तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ५ जानेवारी २०२३ रोजी पाणी सोडण्यात यावे असे या बैठकीत निश्चित झाले.