पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडल्याने एका ११ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरात घडली. गौरी राऊत (वय ११ रा.पिंपळे गुरव), असे मृत मुलीचे नाव आहे. तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाला होत्या आणि तिच्यावर उपचार देखील सुरू होते. दरम्यान, तिने आत्महत्या तर केली नाही ना या दिशेने तपास सुरू असल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडल्याने ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना घडली त्यावेळी घरातील सर्व व्यक्ती झोपेत होते. दरम्यान, काही व्यक्तींनी पहाटेच्या सुमारास गौरी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली पाहिली. त्यांनी तिसऱ्या मजल्यावर जाऊन गौरीच्या घराचे दार ठोठावले. घरातील सर्वजण झोपून होते. त्यांना झोपेतून उठवून घटनेची माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी तातडीने गौरीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरून वाद, पुण्यातील विद्यार्थ्यांनी केला निषेध
गौरी इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत होती. तिच्या दोन्ही किडन्या निकामी होत्या. त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. अशा परिस्थितीत ती शाळेपासून आणि आपल्या मित्र मैत्रिणीपासून दुरावलेली होती. दरम्यान, तिने आत्महत्या तर केली नाही ना, असा प्रश्न सांगवी पोलिसांना पडला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - एक एकरात 43 प्रकारची पिके.. बारामतीतील 'कृषिक' प्रदर्शनात पाहता येणार प्रात्याक्षिक