पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरातील दापोडी येथे एक वर्षांपूर्वी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एका वर्षानंतर पीडित मृत मुलीच्या सावत्र वडिलांना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 40 वर्षीय नराधमाला पुणे स्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. 13 डिसेंबर 2019 रोजी घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांनी अत्याचार करून गळा आवळून खून केला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक नराधम पित्याने आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना 2019 मध्ये घडली होती. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी येथे पीडित मृत अल्पवयीन मुलगी, तिची लहान बहीण, आई आणि सावत्र बाप गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहात होते. आरोपी सावत्र बापाला दोन्ही मुलींवर प्रेमप्रकरण असल्याचा संशय होता. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. घटना घडली त्या दिवशी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि नराधम सावत्र बाप हे दोघेच घरात होते. तेव्हा, त्यांच्यात वाद झाला आणि यातूनच आरोपीने मुलीवर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर बापाने मुलीचे तोंड आणि गळा दाबून खून केला.
गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत होता आरोपी -
या घटनेनंतर आरोपी रिक्षा घेऊन फरार झाला होता. त्याच रिक्षाचा सुगावा घेत तब्बल 700 ते 800 सीसीटीव्ही तपासून भोसरी पोलीस भुगाव येथे पोहचले. तेव्हा, आरोपी हा एका महिलेसह गोव्याला पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पुणे स्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.