पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पाच्या 5 धरणांतील पाणी साठवणूक करणाऱ्या येडगाव धरणात ९५% पाणीसाठा झाला आहे. सांडव्यातून ५ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग कुकडी नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
येडगाव धरण हे जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पाच्या ५ धरणाचे पाणी साठवणूक करणारे धरण आहे. यात आंबेगाव तालुक्यातील डिंभे, जुन्नर तालुक्यातील माणिकडोह, वडज,पिंपळगाव जोगे, चिल्हेवाडी, या धरणांतून पाणी सोडले जाते. त्याचबरोबर पुणे व नगर जिल्ह्याला कुकडी नदीतून आणि कॅनॉल द्वारे पाणी सोडले जाते. सध्याच्या पावसाने उत्तर पुणे जिल्ह्यातील धरणे भरली असल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.