पुणे - दौंड तालुक्यातील देवकरवाडी येथे संपत सोमा थोरात व दादा सोमा थोरात या मेंढापाळाच्या शेळ्या, मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात 9 शेळ्या व 1 मेंढी ठार झाली असून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे मेंढपाळांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा - कोरोनाने घरातील कर्त्या माणसाचा मृत्यू, अज्ञात व्यक्तीने शेतातील साठवलेला कांदा केला नष्ट
बिबट्या असल्याने नागरिक हैराण
राहू बेट भागात बिबट्या ठाण मांडून असून वनविभागाने त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील अनेक गावात कोरोना रुग्ण आहेत, त्यामुळे लोक अगोदरच चिंतीत आहेत. अशा अवस्थेत शेतात जावे तर बिबट्याचे भय. त्यामुळे जायचे कुठे? असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. सद्या कोरोना, बिबट्या व पावसाने लोक हैराण झाले आहेत.
दोन ते तीन बिबट्यांनी केला हल्ला
मिरवडी येथील थोरात बंधूंचा मेंढ्याचा कळप देवकरवाडी येथील मगरवाडी परिसरात मुक्कामी होता. शनिवार (दि.15 ) रोजी रात्रीच्या सुमारास कळपावर दोन ते तीन बिबट्यांनी हल्ला केला असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. यामधील सात शेळ्या बिबट्यांनी शेजारील शेतात फरफटत नेले, तसेच दोन शेळ्या व एक मेंढी कळपातच ठार केली. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले.
पिंजरा बसवण्याची मागणी
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे जि.एम. पवार, शिवकुमार बोंबले व नाना चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच, सरपंच सागर शेलार व माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी भेट देऊन तातडीने या परिसरात पिंजरा बसवण्याची मागणी केली.
हेही वाचा - पुणे जिल्ह्याला मिळाले कोविशील्ड लसीचे फक्त 4 हजार डोस