दौंड (पुणे)- राज्य राखीव दलातील आठ जवानांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली खान यांनी याबाबत माहिती दिली आहे. आठ जवान कोरोनाग्रस्त आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- 'ईटीव्ही भारत'ला पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीदरम्यान राज्यातील मुंबईसह इतर भागांमध्ये बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव दलातील गट क्र. ५ व ७ च्या जवानांच्या दोन तुकड्या 16 एप्रिल रोजी दौंडमध्ये दाखल झाल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
यातील 110 जवानांचा क्वारंटाईन कार्यकाळ संपल्यावर त्यांची मान्यताप्राप्त खाजगी लॅबमध्ये कोरोना विषाणूची तपासणी करण्यात आली. यामध्ये आठ जवान कोरोनाग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. गंभीर बाब म्हणजे यातील एकही जवानांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत.
या कोरोनाग्रस्त जवानांना बाणेर येथे वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले असल्याचे डॉ.खान यांनी सांगितले. तसेच उर्वरित जवानांचा क्वारंटाईन कालावधी आणखी 14 दिवसांनी वाढवला असल्याचेही त्यांनी सांगितले.