पुणे - जिल्ह्यातील एकूण 626 कोविड रूग्णालयात असलेल्या 16293 फंक्शनल बेड्सच्या प्रमाणात 6530 इंजेक्शनसचा पुरवठा रूग्णालयांना स्टॉकिस्टमार्फत करण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे सर्व रुग्णालयांना त्यांच्या बेड्सच्या प्रमाणात औषध पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांनी दिली.
रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शनचे प्रिस्क्रीप्शन देण्यावर बंदी
रूग्णालयामार्फत रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शन विकत आणण्यासाठी प्रिस्क्रीप्शन देण्यात येते. इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू होते. हे इंजेक्शन सध्या बाजारात उपलब्ध नाही. परंतु प्रिस्क्रीप्शन देण्यात आल्यामुळे ते विकत घेतात. त्यामुळे इंजेक्शन काळाबाजार होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोणत्याही रूग्णालयाने रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शन विकत आणण्यासाठी प्रिस्क्रीप्शन देऊ नये. अशी बाब आढळून आल्यास संबंधीत रूग्णालयांना केला जाणारा रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा थांबविण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके
पुणे जिल्हयातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे 11 एप्रिलपासून रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी शहरी भागात 6 भरारी पथके तर ग्रामीण भागात 12 भरारीपथके नेमण्यात आली आहे. या पथकामार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट आणि वितरक यांचेकडील रेमडेसिवीरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.