पुणे - ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे'ला आज (3 जानेवारी) पासून म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरवात झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 57 आणि 79 किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. यात 79 वजनी गट- माती विभागात उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सोलापूरच्या सागर चौगुलेला 5-0 गुणाने हरवत सुवर्ण पदकावर नाव कोरले. तसेच रौप्य पदकासाठी झालेल्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदे याने परभणीच्या गिरिधारी दुबे यावर 8-2 अशी मात करत रौप्य पदक पटकावले. 57 किलो वजनी गट माती विभागात सोलापूर जिल्ह्यातील आबासाहेब अटकळेने सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. याशिवाय कोल्हापूरच्या संतोष हिरुगडेने रौप्य तर, ओंकार लाडने कांस्य पदक पटकावले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर दृष्टिक्षेप
गेल्या वर्षीच्या 57 किलो व 79 किलो रौप्य पदक विजेत्या मल्लांनी यावर्षी 'सुवर्ण' कामगिरी केली आहे. ही कामगिरी समाधानकारक असल्याचे मत हिंद केसरी अमोल बुचडे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी, कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, अॅमनोराचे अनिरुद्ध देशापामदे आणि क्रीडा व युवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
अंतिम निकाल
79 किलो माती विभाग
सुवर्ण- हणमंत पुरी (उस्मानाबाद)
रौप्य - सागर चौगुले (सोलापूर जिल्हा )
कांस्य- धर्मा शिंदे (नाशिक)
57 किलो वजनी गट माती विभाग
सुवर्ण - आबासाहेब अटकळे (सोलापूर जिल्हा)
रौप्य- संतोष हिरुगडे (कोल्हापूर शहर)
कांस्य - ओंकार लाड (कोल्हापूर जिल्हा )