पुणे - शिक्रापूरला सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजीस्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर परिसरातील १४४ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ६२ गरोदर महिलांना शिक्रापूर परिसरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. या ६२ गरोदर महिलांचा स्वॅब तपासणीसाठी देण्यात आला होता. यामध्ये सर्व महिलांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य आधिकारी भगवान पवार यांनी दिली.
शिक्रापूर परिसरातील ६२ गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे, गरोदर महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. ६२ गरोदर महिलांना प्रसूतीपुर्वीच क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते.
या सर्व महिलांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याने मोठा धोका टळला आहे. सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजीस्टच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. सोबतच शिक्रापूर परिसरात निर्जंतुकीकरण फवारणीदेखील करण्यात आली आहे.