पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील 60 हजार नागरिकांनी कोरोनावर मात केल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 हजार 116 वर पोहचली असून आत्तापर्यंत 60 हजार 764 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, दुसरीकडे शहरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा कमी होत नसल्याचे दररोजच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान महानगरपालिकेच्या आरोग्य विभागापुढे नक्कीच आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. दररोज हजारोंनी रुग्ण सापडत होते. मात्र, आता रुग्णसंख्या आठशेच्या जवळपास येत आहे. तर, कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने सूसज्ज असे जम्बो कोविड सेंटर उभारले असून रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार योग्य उपचार केले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 856 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 49 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 318 जण आज करोनातून मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 74 हजार 116 वर पोहचली असून पैकी, 60 हजार 764 जण कोरोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 892 येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.