पुणे - गेल्या काही दिवसात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. काही निर्बंधही आणण्यात आले आहेत. आता पुणे शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयामार्फत सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रासाठी काय नियमावली -
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णांना शोधून त्यांच्यावर लवकर उपचार कसे होतील, याला प्राध्यान्य देण्यात येत आहे. रात्रीची संचारबंदी, शाळा, महाविद्यालये बंदचा निर्णय या आधीच घेण्यात आला आहे. आता शहरात आजपासून 42 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार केले आहेत. शहरातील काही सोसायट्यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, यात लहान सोसायटी असेल तर त्यात जर 5 किंवा पेक्षा ज्यास्त पॉझिटिव्ह रुग्ण असतील आणि मोठ्या सोसायटीत 20 पॉझिटिव्ह रुग्ण असतील तर ती सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात टाकण्यात येते. अशा सध्या 42 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार केले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
हेही वाचा - राष्ट्रपती कोविंद यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
तसेच लसीकरणाबाबत बोलताना, लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अडचणी होत्या. मात्र, आता चांगले नियोजन सुरू आहे, असेही महापौर म्हणाले. लसीकरण खासगी रुग्णालयातही सुरू करत असल्याचे ते म्हणाले. तसेच सिस्टीममध्ये त्रुटी आहेत. जेष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तर, सध्या शहरात 31 लसीकरण केंद्रे आहेत. त्यात, तीन खासगी रुग्णालये असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.