पुणे - शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असलेला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी आवडीचे पर्यटन स्थळ आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करुन देणारा हा किल्ला आहे. या किल्ल्यावर मराठी मावळ्यांनी अपरिमीत शौर्य दाखवले होते. 4 फेब्रुवारीला सिंहगडाच्या लढाईला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त हा स्पेशल रिपोर्ट...
सिंहगडाला अगोदर कोंढाणा नाव होते. त्याच्या निर्मितीनंतर कोंढाणा किल्ला लढाई करुन कोणीही ताब्यात घेऊ शकले नव्हते. मात्र, केवळ दीडशे मावळ्यांना सोबतीला घेऊन नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी हा पराक्रम करुन दाखवला.
हेही वाचा - तेलंगणाच्या धरणाचा गडचिरोलीला फटका; मेडीगट्टाचे दरवाजे बंद केल्याने शेतात पाणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत कोंढण्याला अनन्य साधारण महत्त्व होते. राजकीय अपरिहार्यतेमुळे महाराजांना तह करावा लागला आणि तहात कोंढाणा मुघलांच्या ताब्यात गेला. मुघल सरदार उदयभान राठोडकडे कोंढण्याची जबाबदारी होती. त्याच्या अत्याचाराने जनता भयभीत झाली होती. स्वराज्य कमजोर पडत चालेले असताना महाराजांनी कोंढाणा सर करण्याची मोहीम आखली. तान्हाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून कोंढाणा स्वराज्यात आणला.
कोंढाणा किल्ला जिंकला मात्र, तान्हाजी मालूसरेंसारखा महान योद्धा गमावल्याने 'गड आला पण माझा सिंह गेला' असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते. तेव्हा पासून कोंढण्याचे नाव सिंहगड झाले. सध्या हजारो पर्यटक सिंहगडावर येतात आणि परत जाताना मराठ्यांच्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास घेऊन जातात.