पुणे- सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या निगडे मोसे गावातील छत्रपती शिवाजी महाराज समुह शिल्प स्मारकात मावळा जवान संघटनेच्या वतीने आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात 347 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी तोरणा, राजगड आणि इतर गडकोटांचे तसेच मावळ खोऱ्यातील नद्यांच्या पवित्र पाण्याने शिवरायांना जलाभिषेक घातला गेला.
शिवराज्यभिषेक सोहळ्यात 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या जयघोषात पुष्पवृष्टी, शिवकालीन नाणी, सुवर्णमुद्रांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांना तोलामोलाची साथ देणाऱ्या वीर मावळ्यांच्या वंशज आणि शिवभक्तांनी शिवरायांना मानवंदना दिली.
दरवर्षी मावळा जवान संघटनेच्या वतीने दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पुणे तसेच राज्यातील गडकोटांवरील पाण्याचे जलकुंभ घेऊन शेकडो मावळे, शिवभक्त सहभागी होतात. यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर रायगडावर न जाता शिवभक्तांनी आप आपल्या गावात तसेच घरी शिवराज्याभिषेक साजरा करून शिवरायांना मानवंदना दिली.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेशराव मोहिते , सरदार संभाजी लगड यांचे वंशज अँड. नरसिंह लगड, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे सल्लागार व इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, शिवव्याख्याते तानाजी मरगळे, धनंजय जांभळे , मावळा जवान संघटनेचे युवक अध्यक्ष रोहित नलावडे हे शिवभक्त सहभागी झाले होते.