बारामती - गेल्या दहा महिन्यांत बारामती परिमंडलातील 4 लाख 81 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी एकदाही वीजबिल न भरल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती मेटाकुटीला आली आहे. वीज खरेदी व वितरण करणे मुश्किल बनले आहे. परिणामी अशा थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडून वसुली करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याने महावितरणने या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचा कठोर निर्णय घेतलेला आहे. बारामती परिमंडलात एकूण थकबाकी 340 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
एकरकमी भरणाऱ्यांना सवलत -
लॉकडाऊनच्या काळात जनता घरात असताना महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता झटत होते. लॉकडाऊनमध्ये घरगुती ग्राहकांची वीज मागणी रेकॉर्डब्रेक होती. त्यात रिडींग व वीजबिलाची छपाई बंद असल्याने ग्राहकांना छापील बिलाऐवजी मोबाईल मेसेजवर बिले देण्यात आले. ही बिले सरासरीने व कमी होती. प्रत्यक्षात जून महिन्यापासून रिडींग सुरु होताच रिडींगनुसार बिले देण्यात आली. मात्र यापूर्वीची बिले न भरल्याने थकबाकी वाढत गेली. त्यासाठी थकबाकीचे हप्ते करण्यात आले. एकरकमी भरणाऱ्यांना सवलत देण्यात आली. बिलातील शंका दूर करण्यासाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक देऊन प्रत्येकाला त्याचा वापराचा हिशोब दिला. वीजग्राहकांच्या तक्रारी किंवा शंका निरसन करण्यासाठी राज्यभरात 3,201 वेबिनार व 5,678 मेळावे घेण्यात आले होते. तसेच 15,524 मदत कक्ष सुरु करण्यात आले होते. त्यापैकी 1,742 मदत कक्ष अद्यापही सुरु असून त्यातून आलेल्या नऊ लाख ८० हजार ४९९ पैकी नऊ लाख ३३ हजार ३२४ तक्रारींचे निवारण सुध्दा केलेले आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू -
बारामती परिमंडलामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील जवळजवळ 10 लाख ग्राहकांकडे 518 कोटी रुपये थकीत असून त्यातील दहा महिन्यांत एकदाही वीजबिल न भरणारे 4 लाख 81 हजार ग्राहक असून, त्यांच्याकडे 340 कोटी येणे बाकी आहे. विंनत्या, आवाहन करुनही रक्कम वसुली झाली नसल्याने आता वीज कायद्यातील तरतुदीनुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे.
मंडलनिहाय थकबाकी खालीलप्रमाणे
मंडल कार्यालय | दहा महिन्यांत बिल न भरणारे ग्राहक | रक्कम (रुपये कोटीमध्ये) |
बारामती मंडल | 100118 | 7531.03 |
सातारा मंडल | 133144 | 8742.53 |
सोलापूर मंडल | 248662 | 17760.16 |
बारामती परिमंडल एकूण | 481924 | 34033.72 |