पुणे - नारायणगाव येथील कांदळी एमआयडीसीमधील फिनीक्स पॉलिमर इंडस्ट्रीजच्या पाण्याची टाकी साफ करत असताना तिघे टाकीत पडले. घटनेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलासह एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजूकुमार कलेश्वर ठाकूर वय १५, बिट्टुकुमार महेंद्र यादव (वय १९) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, रसुल युनुस तांडेल (वय ३५ ) हे जखमी आहेत. नारायणगावजवळील कांदळी एमआयडीसीमधील फिनीक्स पॉलिमर इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये असलेल्या पाण्याची टाकी साफ करण्यास अल्पवयीन मुलासह दोघेजण गेले होते. त्यापैकी राजूकुमार आणि बिट्टुकुमार हे टाकीच्या आत उतरले, तर रसुल हे बाहेर उभे होते.
असा घडला प्रकार -
राजूकुमार हा शिडीवरून खाली उतरत असताना त्याचा तोल गेल्याने तो टाकीत पडला. त्याला वाचवण्यासाठी बिट्टुकुमार यादव याने हात दिला असता तोदेखील पाण्याच्या टाकीत पडला. त्यांना पाण्यात पडलेले पाहून रसुल तांडेल टाकीत उतरले. परंतु, तेसुध्दा पाण्यात पडले. त्यानंतर त्यांना बाहेर काढून डॉ . मिनू मेहता मेमोरियल हॉस्पिटल येथे आणले गेले. यावेळी यातील राजूकुमार आणि बिट्टुकुमार हे मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. तर, रसुल तांडेल यांची प्रकृती चिंताजनक आहे.