पुणे: फरासखाना व बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच दिवशी पावणे 3 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक 2 यांनी केली आहे. या प्रकरणी जाहिदुल मोतेहर मलीक उर्फ आकाश मंडल (वय 24 रा. बुधवारपेठ), अलफहाद वजीर सय्यद (वय 27 रा. पुणे कॅम्प) व शहारुख बाबु शेख (वय 29 रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी ताब्यात: पोलिसांना मिळालेल्या बातमीच्या आधारे फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रांती चौक येथे आकाश मंडल हा संशयीत रित्या उभा होता. त्यानुसार पोलिसांनी आकाश मंडल याला ताब्यात घेत त्याच्याकडून 76 हजार रुपयांचे 38 ग्रॅम मॅस्केलाईन अंमली पदार्थाच्या 38 गोळ्या 10 हजार रुपायांचा मोबाईल असा एकूण 86 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
2 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त: तसेच बंडगार्डन येथील कारवाईमध्ये पुणे स्टेशन परिसरात मोपेडवरून अलफहाद वजीर सय्यद आणि शहारुख बाबु हे दोन्ही संशयीत रित्या फिरत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता 2 लाख रुपयांचा 10 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ 40 हजार रुपयांची दुचाकी 20 हजार रुपयांचे 2 मोबाईल असा एकूण 2 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.