पुणे : पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवार पेठेतील एका ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनी मुंबईच्या सराफ व्यवसायिकाचे तब्बल 3 किलो सोने लंपास केले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. पुण्याच्या मध्यवस्तीत घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
आरोपींवर गुन्हा दाखल
फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी सराफा व्यवसायिक जिनेश बोराणा (वय 33) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार लहान मुलगा आणि दोन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्लास्टिकच्या बॉक्समध्ये 3 किलो 139. 40 ग्रॅम सोने लंपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुंबईतील आहेत. त्यांचा सोने-चांदीचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. आज दुपारच्या सुमारास ते रविवार पेठेतील एका सराफ ज्वेलर्सकडे आले होते. त्यांच्याकडे पांढऱ्या रंगांच्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये 3 किलो 139. 40 ग्रॅम सोने होते. याचवेळी या दुकानात खरेदीसाठी दोन महिला व लहान मुलगा आला होता. त्यांनी सव्वातीन किलो सोने असणारा बॉक्स चोरून नेला आहे. त्याची किंमत 1 कोटी 20 लाख रुपये असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.