जुन्नर (पुणे) - गोठ्यावरून गेलेल्या वीजवाहक तारा तुटून गोठ्यात वीजप्रवाह आल्याने गोठ्यातील ५ गायींपैकी ३ गायींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना हिवरे तर्फे नारायणगावातील एकनाथ भिमाजी कुंडलिक यांच्या गोठ्यात घडली.
एकनाथ कुंडलिक यांच्या पत्नी आणि पुतण्यालाही विजेचा धक्का -
गायींच्या दुग्धव्यवसायावर एकनाथ कुंडलिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सकाळी ९ वाजेच्या सुमारास गोठ्यावरून गेलेल्या तीन वीज वाहक तारा अचानक तुटून गोठ्यावर पडल्या. वीज वाहक तारा गोठ्यावर पडताच क्षणी गोठ्यात सर्वत्र विजेचा प्रवाह पसरला. यावेळी गोठ्यात बांधलेल्या ५ गायींपैकी ३ गायींचा तडफडून जागेवरच मृत्यू झाला. यावेळी एकनाथ कुंडलिक यांच्या पत्नी वर्षा एकनाथ कुंडलिक व पुतण्या युवराज दगडू कुंडलिक यांनी तत्काळ गोठ्याचा दरवाजा उघडून गोठ्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपूर्ण गोठ्यात विजेचा प्रवाह पसरल्याने दरवाजाला हात लावताच वर्षा कुंडलिक व युवराज कुंडलिक हे दोघेही विजेच्या धक्क्याने दूर फेकले गेले. सुदैवाने ते बचावले गेले.
हेही वाचा - 'बाजार बंद करा' म्हणताच, फळ विक्रेत्यांनी केला पोलिसांवर हल्ला, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न
एकनाथ कुंडलिक यांच्या गायींच्या मृत्यूने जे काही नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई वीज वितरण कंपनी कडून देण्यात येईल. गावातील जुन्या व जीर्ण वीजवाहक तारा एकाचवेळी बदलणे शक्य नाही. मात्र, टप्याटप्याने या सर्व तारा बदलण्यात येतील, अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक अभियंता दत्तात्रय जाधव यांनी दिली.
हेही वाचा - धक्कादायक! गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची अदलाबदल