पुणे - पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात (market yard area of Pune) दुपारच्या सुमारास पी एम अंगडीया कार्यालयात पाच ते सहा जणांनी गोळीबार करून तब्बल 28 लाखांची रोकड लुटली आहे. (28 lakh cash looted). या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मार्केट यार्ड परिसरात पी एम अंगडीया कार्यालय आहे. या कार्यालयात दुपारच्या सुमारास पाच ते सहा जणांनी येऊन गोळीबार करून 28 लाखांची रक्कम लुटली आहे. हे सर्व आरोपी हे मास्क लावून आलेले होते.
सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात - मार्केट यार्ड परिसरातील एका इमारतीत अंगडिया व्यावसायिकाचे कार्यालय आहे. शनिवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास चोरटे कार्यालयात शिरले. चोरट्यांनी चेहरे कापडाने झाकले होते. चोरट्यांनी अंगडिया कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला आणि पैशांची मागणी केली. कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी चोरट्यांनी गोळीबार केला आणि कार्यालयातील २८ लाख रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.