पुणे - सासवड-पुणे रस्त्यावरील दिवेघाटात नामदेव महाराज पालखी सोहळा जात असताना या दिंडीत जेसीबी घुसल्याने 6 वारकरी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी दोघांचा मृत्यू झाला असून जखमींना हडपसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच दोन वारकऱ्यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. आळंदीत होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त कार्तिकी वारीसाठी हे वारकरी आळंदीला जात होते.
मृतांमध्ये नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास (वय-36) आणि अतुल महाराज आळशी (वय-24) यांचा समावेश आहे. जेसीबीची धडक बसल्याने हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित पालखी पंढरपूरवरून आळंदीला मार्गक्रमण करत असताना हा अपघात घडला. जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. जेसीबी दिंडीत घुसून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.