पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सोमवार पासून सुरू झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सोमवारपासून या परीक्षा सुरू झाल्या. ऑनलाईन परीक्षेसाठी २९, हजार २३६ विद्यार्थी अपेक्षित होते तर ऑफलाईन साठी ४८८१ विद्यार्थी अपेक्षित होते. त्यापैकी दिवसभरात एकूण १७ हजार ११८ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे ऑनलाइन पध्द्तीने परीक्षा दिली. तर १ हजार ८११ विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिली.
तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे, त्यांच्या परीक्षा संबंधित केंद्रांवर सुरळीतपणे पार पडल्या, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ही परीक्षा घेत तशी सर्व व्यवस्था निर्माण केली, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
ऑफलाइन किंवा ऑनलाइन परीक्षांमध्ये काही व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. सदर परीक्षा त्याच दिवशी घेण्याचा विद्यापीठाचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. तरीही परीक्षेपूर्वी काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संयम बाळगून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी केले आहे.