पिंपरी-चिंचवड - पोलीस आयुक्तालयातील एकूण 149 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 120 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पैकी 90 जण हे कर्तव्य देखील बजावत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यापासून शहरातील पोलीस ऑन ड्युटी 24 तास अशी परिस्थिती झाली आहे. त्यांचा थेट संपर्क नागरिकांशी येत असल्याने शहरातील 149 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोरोना ची लागण झाली होती.
120 जणांनी कोरोनावर मात केली असून 29 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कौतुकास्पद बाब म्हणजे बरे झालेल्यांपैकी 90 पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. पोलीस आयुक्तालयातील 2 हजार 117 अधिकारी आणि कर्मचारी यांची कोविड आणि इतर आजाराची चाचणी केली आहे. कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. विविध प्रकारची औषध देण्यात आली आहेत. तरी देखील शेकडो जणांना कोरोनाची लागण झाली आहे.