पुणे - सध्या राज्यात सगळीकडे कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय. यातून कोणीच सुटले नाही. मात्र, या सगळ्या परिस्थितीत रुग्णवाहिकेचे काम करणारे चालक मात्र त्यांची भूमिका चोखपणे पार पाडताहेत.
108 हा क्रमांक डायल केला की कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेची मदत मिळते. घटनास्थळावरून रुग्णाला रुग्णालयात पोहोचवणारा हा जणू एक दुवाच असतो. कोणीही या मदतीपासून वंचित राहत नाही. मात्र राज्यात कोरोनाची दोन हात करणारे चालकही आता कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. राज्यात तब्बल 35 चालकांना कोरोनाची लागण होऊनही ते मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली सेवा करत आहेत. खरंतर राज्यभरात अनेक कर्मचारी या सेवेत आपलं योगदान देत आहेत. मात्र, खचून न जाता गाडीची स्टेअरिंग धीटपणे हातात घेऊन कोरोनाला वळण मारण्याचं काम हे चालक करतात.
108 क्रमांक हा फक्त आकडा नाही तर आयुष्य वाचवण्यासाठीचा हा कॉल आहे. कुटुंबासाठी गाडीची स्टेअरिंग हातात घेतलेले हे चालक आज मात्र कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी गरगर फिरुन लोकांचे जीव वाचवत आहेत. अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या गल्ली बोळातून दाट वस्तीतून नागरिकांचे प्रबोधन करत त्या रुग्णाला रुग्णालयात पोहचवल जात आहे. अनेक ठिकाणी तर जीव धोक्यात घालून या लोकांना आपलं कर्तव्य पार पाडाव लागत आहे. बीव्हीजी ग्रूपच्या वतीने महाराष्ट्रात अनेक वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत. यात महाराष्ट्रात 937 रुग्णवाहिका सध्या कार्यरत आहेत. यापैकी 300 रुग्णवाहिका या कोरोनाच्या रुग्णांकरता काम करत आहेत.
आत्तापर्यंत 41 हजार संभाव्य आणि अॅक्टिव्ह रुग्णांना बीव्हीजीमार्फत सेवा देण्यात आली आहे. ल़ॉकडाऊनमुळे संपूर्ण देश आज घरी असताना आम्ही पूर्ण ताकदीने सेवा देत आहोत. 108 हे आत्ता कोरोनायोद्धा म्हणून काम करत आहे, अशी माहिती बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी यावेळी दिली.