पुणे - कोरेगाव पार्क भागात असलेल्या जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटाला गुरुवारी दहा वर्ष पूर्ण झाली. 13 फेब्रुवारी 2010 ला झालेल्या बॉम्ब स्फोटात 17 लोकांचा मृत्यू झाला होता तर साठपेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. पुण्यात झालेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला होता. दहा वर्षानंतर देखील या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. या घटनेत जीव गमवावा लागलेल्या नागरिकांना गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.
जर्मन बेकरीच्या स्फोटात मृत्यू झालेल्यांमधे एक इटालियन महिला, दोन सुदान आणि एका इराणच्या विद्यार्थ्याचा समावेश होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेची दखल घेतली गेली. तोपर्यंत शांत-निवांत आणि सुरक्षित समजले जाणारे पुणे या स्फोटामुळे दहशतवादाच्या नकाशावर आले.
हेही वाचा - Exclusive: काश्मीरचाही विकास मुंबईसारखा व्हावा.. मराठी अन् काश्मिरींच्या भाव-भावना एकच
पुण्याच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क भागातील त्या दिवशीची संध्याकाळ नेहमीप्रमाणे निवांत होती. देशी-विदेशी नागरिक जर्मन बेकरीतील पदार्थांचा आस्वाद घेत होते. सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी जर्मन बेकरी हादरली. काही समजण्याच्या आतच येथे रक्तामांसाचा सडा पडला. या स्फोटात नऊ जणांचा जागेवर मृत्यू झाला, तर आणखी आठ जण उपचारादरम्यान मरण पावले. साठपेक्षा अधिक लोक या स्फोटात जखमी झाले होते. अशा या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या विकास गौरव यांनी दहा वर्षांपूर्वीच्या भयावह घटनेच्या आठवणी सांगितल्या.
हेही वाचा - जिप्सी चालक, गाईडला अतिउत्साहीपणा नडला, ताडोब्यात वाघाची वाट अडवल्याने निलंबनासह प्रवेशबंदी
या स्फोटासाठी लष्कर-ए-तोयबा आणि सिमी या दोन दहशतवादी संघटनांना जबाबदार धरण्यात आले. या प्रकरणी 9 सप्टेंबर 2010 ला हिमायत बेगला अटक करण्यात आली. 2014 मध्ये यासीन भटकळला अटक करण्यात आली. पुढे आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली आणि हिमायत बेगला पुणे सत्र न्यायालयाने या स्फोटांसाठी दोषी धरले आणि फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत केले. या प्रकरणातील इतर पाच दहशतवादी अजुनही फरार आहेत, तर यासीन भटकळला अजून शिक्षा होणे बाकी आहे. त्यामुळे या स्फोटात जे मृत्युमुखी पडले आहेत, त्यांचे कुटुंबीय अजुनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
दहशतवाद्यांनी ज्या उद्देशाने हा स्फोट घडवला होता, तो मात्र पुणेकरांनी आणि जर्मन बेकरीने कधीच अयशस्वी ठरवला आहे. कारण थोड्याच दिवसात जर्मन बेकरी आणि इथले लोक सावरले. ही जर्मन बेकरी नव्या रंगात, नव्या ढंगात पुन्हा सुरू झाली. आज अनेक देशी- विदेशी नागरिक या जर्मन बेकरीमधील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.