परभणी- सेलू तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे आज एका तरुणाच्या अंगावर पेट्रोलची कॅन ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीश बरसाले (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. घरासमोरील नाली काढण्याच्या आणि ओटा तोडल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादाचे पर्यावसन हत्येत झाले. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी मात्र फरार झाले आहेत.
सेलू तालुक्यातील वालूर रस्त्यावरील ब्राम्हणगाव येथे शनिवारी सकाळी कॅनल कॅम्पजवळ खोसे आणि बरसाले कुंटुबीयात वाद झाला होता. घरासमोरील नाली काढणे आणि ओटा तोडल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद टोकाला गेला. यातूनच खोसे कुटुंबीयातील चार ते पाच जणांनी ३० वर्षीय सतीश बरसाले याला बेदम मारहाण केली. मारहाण करून ते थांबले नाही, तर एकाने पेट्रोलने भरलेली कॅन सतीश बरसाले यांच्या अंगावर ओतली आणि दुसऱ्याने त्यास लगेच काडी लावून पेटवून दिले. क्षर्णाधात या पेट्रोलने पेट घेतल्याने सतीश बरसालेचा अक्षरशः कोळसा झाला.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलीस उशीरापर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते. तोपर्यंत सर्व आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, मृत सतीश बरसाले यांच्या आई व पत्नीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.