परभणी - गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला राग मतदान जनजागृती करण्यासाठी आलेल्या पथकावर व्यक्त केला. गावकऱ्यांनी पथकाला साहित्य गुंडाळायला लावत अक्षरशः गावातून पिटाळून लावले. हा प्रकार जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील खडकवाडी येथे घडला.
हेही वाचा - बेस्ट वर्कर्स युनियन आणि कृती समितीने पुन्हा उगारले संपाचे हत्यार
खडकवाडी येथील शेतकरी गावातील हनुमान मंदिरात ३१ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे दीड लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज आहे, त्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणे अपेक्षित असताना बँक प्रशासनाच्या वतीने विशिष्ट रक्कम भरण्यासाठी सांगितली जात असल्याचा आरोप, आंदोलक शेतकरी करत आहेत.
हेही वाचा - अशोक चव्हाणांना विरोधक पकडणार कोंडीत...भोकरमधील भाजपच्या हालचाली वाढल्या
दरम्यान, या आंदोलकांची लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. मात्र, तोडगा न निघाल्याने 18 व्या दिवशी देखील हे आंदोलन सुरू होते. आंदोलन सुरू असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनवर मतदान कसे करायचे? याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तहसील कार्यालयाचे पथक खडकवाडी गावात दाखल झाले होते. पथकातील कर्मचाऱ्यांनी गावातील हनुमान मंदिरासमोर एका टेबलवर ईव्हीएम मशीन ठेऊन ग्रामस्थांना प्रात्याक्षिक दाखविण्यासाठी बोलविले.
हेही वाचा - मंदीतून बाहेर पडण्यासाठी अर्थ तज्ञांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन करा, मुणगेकरांचा सरकारला सल्ला
मात्र, कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत हे प्रात्यक्षिक बंद पाडले. फसव्या कर्जमाफीबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे त्या अधिकाऱ्यांना सांगितले. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून तहसील कार्यालयाच्या पथकानेही काढता पाय घेतला.