परभणी - जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. यामध्ये लाखो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव आणि इसाद या गावातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. यावेळी शासनाने त्यांचे निकष बाजूला ठेवावेत आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये तात्काळ द्यावेत, अशी मागणी आपण सरकारकडे केल्याची माहिती त्यांनी दिली.
अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी आणि सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे लावून धरली. खरीप सोबतच रब्बीचा हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून गेल्याची व्यथा यावेळी उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आली.
प्रशासनाकडून बांधावर येऊन पंचनामे होणार आहेत. शेतकऱ्यांना कुठलेही कागदपत्र किंवा पुरावे देण्याची आवश्यकता नाही. नुकसान झालेलं सर्वांच्या पुढेच आहे. त्यामुळे निश्चित राहा, प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळेल. शेतकऱ्यांना कुठलेही निकष न लावता तात्काळ हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी मी शासनाकडे केली आहे. ती पूर्ण करून घेण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते तथा मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर, खासदार संजय जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान परभणीवरून उद्धव ठाकरे गंगाखेडमार्गे परळीकडे रवाना झाले.