परभणी - संचारबंदीत पुण्यातून दुचाकीवर मूळगावी परतलेल्या क्वारंटाईन कुटुंबातील २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना जिंतूर तालुक्यातील सोस-जोगवाडा येथे सोमवारी घडली आहे. चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबातील सर्वांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच चिमुकल्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? हे स्पष्ट होणार आहे.
मजुरीच्या निमित्ताने सोस-जोगवाड्याचे कुटुंब पुण्यातील भोसरी येथे राहते. मात्र संचारबंदीमुळे ते कुटुंब 14 मे रोजी दुचाकीने गावी परतले होते. मात्र गावकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर या कुटुंबाला जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. परंतु दोन दिवस जिल्हा परिषद शाळेत राहिल्यानंतर त्या कुटुंबीयाने स्वतःच्या घरात क्वारंटाईन होण्याची इच्छा दर्शविली. त्यानंतर ते घरीच क्वारंटाईन झाले. या दरम्यान सोमवारी या कुटुंबातील 2 वर्षांच्या चिमुकल्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला गावातील आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत जोगवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जिंतूरला घेऊन जाण्यास सांगितले.
कुटुंबीयांनी धावपळ करत तेथून चिमुकल्याला जिंतूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात येताच तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
घटनेनंतर तात्काळ चारठाणा आरोग्य कर्मचार्यांची संपूर्ण टीम सोस-जोगवाडा येथे दाखल झाली. त्यांनी क्वारंटाईन केलेल्या कुटुंबीयांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. ते स्वॅब तपासणीसाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून सदर गावातील लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर स्वॅबचा तपासणी अहवाल येत नाही, तोपर्यंत सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे.