परभणी - बनावट नोटा चलनात आणणाऱ्या परभणी व माजलगाव येथील एका सक्रिय टोळीला परभणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने केली. या प्रकरणी पोलिसांनी परभणी तालुक्यातील वडगाव सुक्रे व बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून प्रत्येकी 2 जणांना बनावट नोटांसह अटक केली आहे.
दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव सुक्रे येथे सोमवारी रात्री काही व्यक्ती दोनशे रुपयांच्या बनावट नोटा लोकांना देत फसवणूक करत असल्याची माहिती विशेष पथकाचे फौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी राहुल चिंचाणे, सुग्रीव केंद्रे, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, दीपक मुदिराज, विष्णू भिसे यांच्या पथकाची निर्मिती केली. या पथकाने गावात भेट दिली. त्यावेळी तेथे 3 जण 200 रुपये दराच्या बनावट नोटा जाणीवपूर्वक लोकांना देत असल्याचे आढळून आले. त्यांना पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यानी ताब्यात घेतले.
'200 रूपयांच्या 48 बनावट नोटा जप्त'
बनावट नोटा चलनात आणणाऱ्या वडगाव सूक्रे येथील दोघांकडून 200 रूपयांच्या 48 बनावट नोटा पथकाने जप्त केल्या. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी माजलगाव येथून एका व्यक्तीकडून नोटा आणल्याची माहिती पथकास दिली. पथकाने तातडीने हालचाली करत माजलगाव येथून आणखी दोघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
'टोळीतील चौघेही माजलगावचे रहिवासी'
या प्रकरणी पोलीस कर्मचारी राहुल चिंचाने यांनी दैठणा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बनावट नोटा बाळगून त्या जाणीवपूर्वक लोकांना देत त्यांची फसवणूक करणाऱ्या सय्यद फिरोज, मारोती साळुंके, भागवत शिंदे, नूर मोहम्मद हाशम अतार (सर्व रा. माजलगाव) यांच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 48 बनावट नोटा तसेच एक मोटरसायकलदेखील जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.